सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात असलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानाची तारीख जवळ येत असताना सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपच्या गोटातील हालचालींना सोमवारी वेग आला. शिवसेनेचे बहुसंख्य आमदार बॅगा घेऊन मुंबईत दाखल झाले असून, पुढील तीन दिवसांसाठी त्यांची सोय ‘रिट्रीट’ हॉटेलमध्ये करण्यात आली आहे.
निवडणुकीत शिवसेनेच्या २ उमेदवारांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेने रणनीती आखली आहे. सोमवारी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेसह काही अपक्ष आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर सर्व आमदारांना बसमधून हॉटेलमध्ये नेण्यात आले आहे. त्यानंतर आज सायंकाळी महाविकास आघाडीमधील सर्व आमदारांची बैठक होणार आहे. मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असताना वांद्रे-कुर्ला संकुलात अशाच पद्धतीने तीनही पक्षांच्या आमदारांची बैठक झाली होती. त्यातून आपले संख्याबळ आघाडीने दाखवून दिले होते. अशाच पद्धतीचे शक्तीप्रदर्शन या बैठकीतून करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील आणि पक्ष निरीक्षक मल्लिकार्जुन खरगे मार्गदर्शन करणार आहेत.