मुंबई | ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याच्या मुद्यावरुन राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. या सरकारला वेळोवेळी ओबीसी हितासाठी मजबूर केलं आहे. आज ज्या परिस्थितीत ही कार्यकारिणी होते ती दुख:द आहे. निवडणुका ओबीसी आरक्षणाविना निवडणुका होत आहेत. हे राजकीय आरक्षण गेलेले नाही तर महाविकास आघाडी सरकारनं ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची कत्तल केलीय, असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. भाजपच्या ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारणीमध्ये ते बोलत होते.
फडणवीसांनी म्हटलं की, महाविकास आघाडी सरकारनं ओबीसीच्या राजकीय आरक्षणाची कत्तल केली आहे. यात मोठे षड्यंत्र आहे. सरकारला कोर्टानं सात वेळा तारीख देऊनही कार्यवाही पूर्ण केली नाही. नंतर यांच्या खोट्या सबबींवर तारीख देण्यास कोर्टानं नकार दिला, असं फडणवीस म्हणाले. कोर्टाने ट्रिपल टेस्ट करा असं कोर्टाने 2019 साली सांगितलं. त्यावेळी ठाकरे सरकार होतं पण सरकारने फार काही केलं नाही. सहा वेळा वेळ मागितली, कार्यवाही पूर्ण केली नाही, असंही त्यांनी सांगितलं. सातत्यानं महाविकास आघाडीकडून विश्वासघाताचं राजकारण केलं जात आहे. योग्य काळजी न घेताच आकडेवारी सरकारनं सादर केली, असंही ते म्हणाले.
फडणवीस म्हणाले की, २०१० साली ५० टक्के आरक्षण देता येणार नाही आणि ट्रिपल टेस्ट केल्याशिवाय आरक्षण देता येत नाही असं सांगितलेलं. त्यावेळी कॉंग्रेसचे सरकार होते. कोर्टात जाणारे कोण आहेत तर एक काँग्रेस आमदारांचा मुलगा तर दुसरा नाना पटोले यांचा कार्यकर्ता. कोर्टात कोण गेलं तर काँग्रेसवाले गेले. पण आम्ही सजग होतो आणि आम्ही तात्काळ केंद्र सरकारकडून जनगणनेचा डेटा मागितला. रातोरात आम्ही अध्यादेश काढला, असं त्यांनी सांगितलं. काँग्रेसकडून ओबीसींचा वापर हा दिखाऊपणापुरताच केला गेला आहे, असा आरोपही त्यांनी केला.