मुंबई | मनसेच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवण्यात आली असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात पार पडलेल्या सभेत केला. दरम्यान, मनसे नेत्यांकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेते बृजभूषण सिंह यांचा फोटो ट्विट करण्यात आला आहे. या फोटोमध्ये बृजभूषण आणि शरद पवार तसेच सुप्रिया सुळे एकत्र पाहायला मिळाले. त्यामुळे राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यामागे शरद पवारांचा हात असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
मनसे नेते गजानन काळे, संदीप देशपांडे आणि सचिन मोरे यांनी बृजभूषण सिंह यांचा शरद पवार आणि सुप्रिया सुळेंसोबतचा फोटो ट्विट केला आहे. काळे यांनी ट्विटमध्ये लिहिले, हा फोटो मावळमधील एका कार्यक्रमातील आहे. सध्या या फोटोची चर्चा सर्वत्र असून यावरून आता राजकारण चांगलेच तापले आहे. अशातच मनसेचे प्रवक्ते योगेश चिले यांनी शरद पवारांवर ट्विट करत जहरी टीका केली आहे. महाराष्ट्र त्यांना यापुढेही भावी पंतप्रधान म्हणून हिणवत राहील अशा शब्दांमध्ये चिली यांनी ट्विट केले आहे.
योगेश चिले यांनी ट्विट केले आहे की,’एका मराठी माणसाला श्रीरामाचे दर्शन होऊ नये म्हणुन “षडयंत्र रचणारा” एक नास्तिक मराठी माणुस अवघ्या महाराष्ट्राने पाहीला… विश्वासहार्यता नाही म्हणुन पंतप्रधान बनता आलं नाही… महाराष्ट्राचे कायमचे भावी पंतप्रधान म्हणजे शरद पवार असा टोला त्यांनी ट्विट करून लगावला आहे.