राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता तसेच त्यांनी एनसीबीने त्यांच्या जावयावर केलेली कारवाई खोटी असल्याचं म्हटलं आहे. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दल पत्रकारांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी ‘माझ्या जावयाकडे गांजा सापडलाच नाही. एनसीबीला गांजा आणि तंबाखू यातला फरक कळतो की नाही?’ असा सवाल विचारला आहे. आता एनसीबीने एक महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं समोर आलंय.
पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी समीर खान यांच्यावरील कारवाईबाबत अनेक खुलासे केले होते. यावेळी त्यांनी एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर आता एनसीबीने एक मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. एनसीबी आता नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना मिळालेल्या जामीनाविरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आहे.
समीर खान यांना २७ जानेवारीला जामीन मंजूर झाला होता. समीर खान यांना मिळालेल्या या जामीनाला एनसीबी आता मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. माझ्या जावायाकडे गांजा सापडला नसून जावयाकडे सापडलेली हर्बल तंबाखू होती, असं कोर्टाच्या ऑर्डरमध्ये नमूद केलेलं असतानाही एनसीबीने कारवाई केली असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. याशिवाय एनसीबीची कारवाई फर्जी असल्याचंही मलिक यांनी म्हटलं होतं.