लवासा हिल स्टेशन प्रकरणात शरद पवारांवर अनेक आरोप करण्यात आले आहेत. अशातच आता भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याप्रकणी शरद पवार आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एका नव्या वादाला तोंड फुटलं असून थेट शरद पवारांवर आरोप केल्यामुळे राजकारण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ज्यांनी लवासाबाबत सत्तेचा दुरुपयोग केला आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल होईपर्यंत मी शांत बसणार नाही, असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे. दोन गावांचा निर्णय आला आहे. अजून 18 गावे बाकी आहेत. त्यांच्यावर कारवाई कधी करणार, पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन, शेतकर्यांच्या जमिनी कवडीमोल दराने विकत घेणे आणि बेकायदेशीरपणे त्या ताब्यात घेऊन सरकारच्या विविध विभागांकडून परवानग्या थेट मिळवून लवासा हिल स्टेशन प्रकल्प उभारण्यात आला आहे, असे अनेक आरोप प्रकल्पाविषयी सोमय्या यांच्याकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, लवासा प्रकल्पाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय अजित गुलाबचंद आणि शरद पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती यांची मोठी भागीदारी असल्यानेच तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार जलसंपदा मंत्री असताना त्यांच्या आदेशामुळे प्रशासकीय विभागांची मंजुरी मिळाल्याचा आरोप केला गेला आहे.