नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत भाषण केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसने मजुरांना स्थलांतर करण्यासाठी भाग पाडलं, त्यासाठी मोफत तिकीटं त्यांना देण्यात आली, असा आरोप केला. त्यांच्या आरोपावर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सडेतोड प्रतिउत्तर दिले आहे.
सुळे यांनी संसद सभागृहात तत्कालीन रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी केलेले पाच ट्विट आणि ट्रेन सुरू केल्याबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गोयल यांचे आभार मानणारे केलेलं ट्विटही सुप्रिया सुळे यांनी दाखवत पोलखोल केली आहे. युपी, बिहारींना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी केंद्र सरकारनेच ट्रेन सुरू केल्या होत्या. आम्ही केवळ त्यांच्या तिकीटाचे पैसे दिले. आता मोदी राज्या राज्यांत भांडणे का लावत आहात? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला.
सुप्रिया सुळे यांनी आज दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, काल पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राबाबत जे काही म्हंटले. ही मला स्वतःला वैयक्तिकपणे दुःख देणारी गोष्ट आहे. ज्या राज्यानं फुल न फुलाची पाकळी म्हणा. पण १८ खासदार भाजपला महाराष्ट्रानं निवडून दिले आहेत. म्हणजे, मोदींना पंतप्रधान होण्यासाठी महाराष्ट्रातील मतदारांचा मोठा वाटा आहे. त्या महाराष्ट्राच्या मतदारांचा आणि महाराष्ट्राचा अपमान कोविड सुपर स्प्रेडर म्हणून त्यांनी केला. हे अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी आहे असे सुद्धा त्यांनी यावेळी बोलून दाखविले होये.