मुंबई | महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांना ईडीनं चौकशीसाठी बोलावल्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधात बसलेल्या भारतीय जनता पक्षाचे नेते आमनेसामने आले आहेत. दहशतवाद्यासोबत जमीन व्यवहार केल्याप्रकरणी मलिकांना ईडीनं चौकशीसाठी बोलावलं आहे.बुधवारी पहाटे ईडीचे अधिकारी मलिकांच्या घरी पोहचले. त्यानंतर नवाब मलिक स्वत: ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. मात्र या प्रकारावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपावर हल्लाबोल सुरू केला आहे.
या प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, हा पुन्हा एकदा सत्तेचा दुरुपयोगाचा प्रकार आहे. कोणतीही नोटीस न देता राज्यातील एका मंत्र्यांना घेऊन जाणे ही सर्वच गोष्टीची पायमल्ली आहे. हे वर्तन देशाच्या संघराज्य व्यवस्थेच्या विरोधातील आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निषेध व्यक्त केले आहे.
तसेच शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, नवाब मलिक किंवा आम्ही सातत्याने बोलतोय, सत्य बोलतोय त्यांच्यामागे ईडी सीबीआय मागे लावले जातेय. चौकशी होईल आणि संध्याकाळी घरी येतील. माझे सर्वांशी बोलणे झाले. चौकशी होऊ शकते. राज्याच्या एक मंत्र्यांला ईडी चौकशीसाठी बौलावले जाते. किरीट सोमय्यांनी ईडीकडे हे प्रकरण दिलं आहे. भाजपा नेत्यांची आम्ही सगळी प्रकरणे ईडीकडे देणार आहोत. भाजपा व्यतिरिक्त सर्व पक्षासाठी ईडी आहे का? असा सवाल त्यांनी विचारला आहे .