कोल्हापूर उत्तर निवडणुकीच्या निकालानंतर शविसेनामाजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर गंभीर आरोप लगावला आहे. भाजपकडून निवडणूक लढवावी म्हणून भाजपच्या नेत्यांनी मला ऑफर दिली होती, परंतु मी सच्चा शिवसैनिक असल्यामुळे आणि मी काहीच नव्हतो, तेव्हापासून पक्षाने मला भरपूर दिल्यामुळे ती ऑफर नाकारली आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विजयासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले, असा गौप्यस्फोट राजेश क्षीरसागर यांनी बुधवारी येथे केला.
एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर संवाद साधताना त्यांनी हा आरोप केला आहे पुढे ते म्हणाले की, पक्षवाढीसाठी केलेले प्रयत्न, सामाजिक कार्याच्या माध्यमातून जनतेशी जोडलेली नाळ, पक्षनेतृत्वाबद्दलची निष्ठा आणि प्रसंगी करावा लागलेला त्याग याची दखल म्हणून पक्षाने गत निवडणुकीत हरल्यानंतरही मोठे मानाचे पद दिले.
भाजप-शिवसेना युती असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी २०१९ च्या निवडणुकीत माझ्यासह शिवसेनेच्या जिल्ह्यातील सहा विद्यमान आमदारांचा पराभव करण्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न केले. कारण त्यांना त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री करण्याकरिता भाजप आमदारांची संख्या वाढवायची होती, असा आरोपही क्षीरसागर यांनी केला.