कोल्हापूर | आगामी काळात महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकांचे रान्गशिंग फुंकले जात असून कोल्हापूर, नाशिक, पुणे, मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे यासर्व महापालिकांच्या निवडणूक आगामी काळात होणार असल्याने राजकीय पक्षांनी आतापासूनच कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. अशातच राज्यात भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडी यांच्यात मुख्य लढत होणार आहे.
भारतीय जनता पक्षाने आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या विश्वासू शिलेदारांना जबादारी सोपविण्यास सुरुवात केली आहे. यात सर्वप्रथम कोल्हापूरचा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. मुंबई, पुणे, नाशिक महानगरपालिका निवडणुकांची जबादारी याआधीच विश्वासू नेत्यांना सोपविण्यात आली आहे.
कोल्हापुरात माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष लढणार असल्याचे मुंबईत झालेल्या पक्षाच्या कोअर समिती बैठकीत सांगण्यात आले आहे. याबाबतचा निर्णय प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत धनंजय महाडिक गटाचा सामना ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या आघाडीशी होईल.