मुंबई | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप लगावले होते. याच पार्श्वभूमीवर सोमय्या याना अनेक धमांचे फोन येऊ लागले होते. त्यामुळे संरक्षण देण्याची मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून सोमय्या ऍक्टिव्ह मोडमध्ये असून शिवसेना, राष्ट्रवादीचे मंत्री त्यांच्या रडारवर आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब, शिवसेना खासदार भावना गवळी, मंत्री छगन भुजबळ यांच्यावर सोमय्यांनी घणाघाती आरोप केले आहेत.
महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून ठाकरे सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सातत्यानं किरीट सोमय्या करत आहेत. ठाकरे सरकारमधील मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढत असल्यानं धमक्या येत असून जीवाला धोका असल्याचा दावा सोमय्यांनी केला होता. त्यामुळे त्यांनी केंद्राकडे सुरक्षेची मागणी केली होती. त्यानंतर आता केंद्रानं त्यांना झेड दर्जाची सुरक्षा दिली आहे.
गेल्या मुंबई महापालिका निवडणुकीआधी शिवसेना वि. सोमय्या यांच्यातला वाद पेटला होता. महापालिकेत भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप सोमय्यांनी केले होते. सोमय्यांनी थेट मातोश्रीचा उल्लेख करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं होतं. त्यांनी वारंवार माफिया शब्दाचा वापर केला होता. त्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले होते. लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेना नेत्यांनी सोमय्यांना तिकीट न देण्याची मागणी केली. त्यामुळे सोमय्यांचे तिकीट कापलं गेलं.