अभिनेता अजय देवगण आणि साऊथ अभिनेता किच्चा सुदीप यांच्यातील ट्विटर वॉर चांगलेच रंगले असून हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून या दोघांमध्ये जोरदार तूतू-मैंमैं झाली होती. अगदी नेटकरीदेखील प्रतिक्रियांच्या माध्यमातून या वादात सामील झाले होते. मात्र, आता अभिनेत्री कंगना रनौत हिने या वादात उडी घेतली आहे. कंगनाने देखील या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेत्री कंगना रनौत तिच्या बेधडक शैलीसाठी ओळखली जाते. कोणत्याही विषयावर आपलं मत मांडायला अभिनेत्री मागे राहत नाही. नुकताच कंगनाच्या ‘धाकड’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. या सोहळ्यात कंगनाने ‘हिंदी’ भाषेच्या या वादावर मोठं वक्तव्य केलं आहे.
या वादावर प्रतिक्रिया देताना कंगना म्हणाली की, ‘या प्रकरणावर माझ्याकडे थेट उत्तर नाही. आपला देश विविधतेने, विविध भाषांनी आणि विविध संस्कृतींनी बनलेला आहे. प्रत्येकाला आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटणे हा जन्मसिद्ध अधिकार आहे. मात्र, आपल्या देशाला एकत्र बांधून ठेवण्यासाठी एक धागा हवा आहे.
संविधानाचा आदर करायचा असेल, तर हा आपल्या राज्यघटनेने हिंदीला राष्ट्रभाषा केली आहे. मात्र, तमिळ हिंदीपेक्षा जुनी आहे आणि संस्कृत तर त्याहून जुनी आहे. मला असे वाटते आपली राष्ट्रभाषा संस्कृत असली पाहिजे. कारण, कन्नड, तमिळ, गुजराती ते हिंदी सर्व भाषा संस्कृतमधून आल्या आहेत.
आता संस्कृत सोडून, हिंदी का बनवली गेली याचे उत्तर माझ्याकडे नाही. हे त्यावेळी घेतलेले निर्णय आहेत. पण जेव्हा खलिस्तानची मागणी होते, तेव्हा ते म्हणतात की आमचा हिंदीवर विश्वास नाही. तरुणांची दिशाभूल करत असताना, ते संविधान नाकारत आहेत. वेगळे राष्ट्र व्हावे यासाठी तमिळांचे आंदोलनही झाले.
जेव्हा तुम्ही हिंदी नाकारता, तेव्हा तुम्ही दिल्लीच्या सरकार आणि आपले संविधानही नाकारता. तुमचा सरकारवर विश्वास नाही, मग ते सर्वोच्च न्यायालय असो, कोणत्याही प्रकारचे कायदा असो… दिल्लीत सरकार जे काही करते, ते हिंदीत करते, नाही का? असा सवाल तिने विचारला आहे.