मुंबई | ‘द कश्मीर फाइल्स हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. देशभरातून या चित्रपटाचे जोरदार कौतुक होत आहे. 11 मार्च रोजी रिलीज झालेला ‘द कश्मीर फाइल्स’ 1990च्या कश्मीर बंडखोरी दरम्यान काश्मिरी हिंदूंच्या निर्गमनावर आधारित चित्रपट आहे. मात्र, या चित्रपटाच्या निमित्ताने दोन गट पडलेले देखील पाहायला मिळाले.
देशभरातून या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर, दुसरीकडे अनेकांकडून चित्रपटावर जोरदार टीका देखील केली जात आहे. सोशल मीडियावर देखील अशाच प्रकारचे दोन गट पडलेले पाहायला मिळाले. दरम्यान, अभिनेते नाना पाटेकर यांनी देखील या वादावर भाष्य करत आपले रोखठोक मत मांडलं आहे. पुण्यातील सिम्बॉयसिस महाविद्यालयाच्या सिम्बीऑनलाईन मोबाईल अॅपच्या लॉंचिंगवेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
या कार्यक्रमाच्या वेळी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावरुन समाज माध्यमांत जे गट पडले आहेत, त्यावर नाना पाटेकर यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना नाना म्हणाले की, ‘मला असं वाटतं की, इथले हिंदू आणि इथले मुसलमान हे इथलेच आहेत. त्यांनी एकत्र राहणे हे गरजेचे आहे आणि त्यांनी एकत्रच राहावे. यात जर गट पडत असतील, ते ते चुकीचं आहे. गट पडण्याची गरजच नाही. अजून मी हा चित्रपट पाहिलेला नाही. त्यामुळे चित्रपटाविषयी सविस्तर मला बोलता येणार नाही.