राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्यानंतर खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला.जामीन मंजूर झाल्यानंतर पोलिसांनी दिलेल्या अमानवीय वागणुकीविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी राणा दांपत्य सोमवारी दुपारी दिल्लीत दाखल झाले. तसेच भाजपच्या बड्या नेत्यांची भेट सुद्धा दिल्लीत त्यांनी घेतली होती.
लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्याकडे तक्रार दाखल केल्यानंतर खासदार नवनीत राणा 23 मे रोजी हक्कभंग समितीसमोर त्यांची बाजू मांडणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना नवनीत राणांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकेची तोफ डागली. कोणताही गुन्हा नसताना आम्हाला 12 दिवस तुरूंगात डांबलं. जेव्हा आदित्य ठाकरेंना जेव्हा असंच तुरूंगात टाकण्यात येईल तेव्हाच मुख्यमंत्र्यांना त्याची जाणीव होईल, अशा शब्दात नवनीत राणा यांनी संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी तक्रारीची गंभीर दखल घेण्यात येईल असं आश्वासन दिलं. यानंतर राणा दांपत्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील भेट घेणार आहेत. अमित शहा सध्या आसाम दौऱ्यावर असून ते मंगळवारी दिल्लीत परत येतील. यानंतर राणा दांपत्य अमित शहांची भेट घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.