मुंबईत दोन दिवस हनुमान चालीसावरून मोठा गोंधळ पाहायला मिळाला होता. अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेला इशारा दिल्यानंतर हजारोंच्या संख्येनं शिवसैनिक रस्त्यावर उतरल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेची दैना झाली. त्यानंतर राज्यात भाजप विरूद्ध शिवसेना वाद पेटला आहे. अशात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
भोंगा, हनुमान चालीसावरून राज्यात वाद पेटू नयेत म्हणून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीला भाजपचे नेते गैरहजर राहिल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. फडणवीस यांना याबाबत विचारलं असता त्यांनी उत्तर दिलंय. मागील चार-पाच दिवसात आम्ही मुंबई आणि महाराष्ट्रात पाहतोय त्या घटना पाहिल्यानंतर सरकारनं संवादाला जागा ठेवलीये असं आम्हाला वाटत नाही, असं फडणवीस म्हणाले आहेत.
जर कोणी हिटरल प्रवृत्तीनंच वागायचं ठरवलं असेल तर त्यांच्याशी संवादापेक्षा संघर्ष केलेला बरा, असा इशारा देखील फडणवीसांनी ठाकरे सरकारला दिला आहे. यावरून आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. हिटलरशाही सुरू झाल्याची आमची मानसिकता झाल्यानं आम्ही आजच्या बैठकीवर बहिष्कार घातला आहे, असं फडणवीस म्हणाले आहेत.