जळगाव | जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे विरुद्ध भाजप खासदार रक्षा खडसे असा सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपसोबत जाण्यास नकार दिल्याने भाजप स्वतंत्र लढणार आहे. जळगाव जिल्हा बँकेच्या संचालक निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनल निश्चित करण्यात आले होते.
मात्र, काँग्रेस पक्षाने भाजपसोबत जाण्यास नकार दिला होता. काँग्रेसच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीनेदेखील भाजपसोबत पॅनल करण्यास नकार दिला. त्यामुळे आता जळगावात खडसे विरुध्द खडसे राजकीय सामना दिवसण्याची शक्यता आहे. याआधी अजिंठा विश्रामगृहावर १६ ऑक्टोबर रोजी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली.
पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजप नेते गिरीश महाजन, राष्ट्रवादी नेते तथा माजी मंत्री गुलाबराव देवकर राष्ट्रवादी नेते तथा माजी आमदार सतीष पाटील, काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी शिवसेनेचे आमदार किशोर पाटील आदी नेते बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत काँग्रेसने भाजपसोबत जाण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. त्यामुळे या बैठकीत कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नव्हता. काँग्रेस नेत्यांनी ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवण्याची भूमिका मांडली होती.