काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत गंभीर आरोप केला होता. आपल्या मुलांचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक केल्याचा दावा केला. तसेच सरकारकडे आता कोणतंच काम नाही आहे का? असं म्हणत निशाणा साधला होता. सध्या उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीआधी राजकारण तापलं आहे. त्यातच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
देशात फोन टॅपिंग हे प्रकरण गाजत आहे. याच दरम्यान प्रियंका गांधी यांनी टीकास्त्र सोडलं होतं. यानंतर आता मुलांचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करण्याच्या प्रियंका यांच्या आरोपांवर सरकारने उत्तर दिलं आहे. सरकारने या प्रकरणाचे गांभीर्य पाहता चौकशीचे आदेश दिले होते. प्राथमिक तपासानंतर आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाने प्रियंका यांच्या आरोपांवर उत्तर दिले आहे.
केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने याची गंभीर दखल घेतली आहे. मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांच्या आरोपांची दखल घेण्यात आली. याप्रकरणी, सरकारने स्वत: चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर प्राथमिक तपासानंतर आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाने प्रियंका गांधींचे आरोप निराधार असल्याचं म्हटलं आहे.
“मुलांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटशी छेडछाड केली गेली नाही” सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स संसाधन मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये प्राथमिक तपासात काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांच्या मुलांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटशी छेडछाड केली गेली नाही. त्यांनी सरकारवर केलेले आरोप निराधार आणि खोटे असल्याचं म्हटलं आहे.