पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या ५० वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी ढाका येथे पोहोचले होते. त्यांचा हा दोन दिवसीय दौरा आयोजित करण्यात आलेला आहे. भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांनी भारतीय उपखंडातील दहशतवादाचा प्रतिकार करण्यासाठी एकजूट दाखवण्याची आणि जागरूक राहण्याची आवश्यकता आहे, असे वक्तव्य पंतप्रधान मोदींनी बांगलादेशच्या सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात केले होते.
यावेळी कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले की, बांगलादेशला स्वातंत्र्य मिळावे म्हणून मी सुद्धा लढ्यात उतरलेलो, मला अटकही झाली होती असे त्यांनी सांगितले होते. मोदींच्या या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर चर्चा रंगली असताना दुसरीकडे शिवसेना खासदार प्रियाने चतुर्वेदी यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.
चतुर्वेदी यांनी ट्विट करून मोदीजींना विचारले आहे की, १९७१ मध्ये भारतीय पंतप्रधानांनी अमेरिकेसारख्या देशाने केलेल्या विरोधाचा सामना करुनही बांगलादेशला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळवून दिलं. मला प्रश्न पडला आहे की जर सर्व भारतीय एकाच मताचे होते तर सत्याग्रह करण्याची काय गरज होती आणि यासाठी कोणाला अटक का केली जाईल? मला खात्री आहे की १९७१ संदर्भात आपल्याला लवकरच नवीन माहिती मिळेल,” असे त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.