नवी दिल्ली | संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर विरोधी पक्षांनी गुरुवारी संयुक्त मोर्चा काढला होता. या मोर्चाह्चे नेतृत्व काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी केले होते. यावेळी विरोधी पक्षातील डजनभर नेते सामील झाले होते. यावेळी राहुल गांधी यांनी सरकारवर गंभीर आरोप केले, तसेच सभागृहात खासदारांसोबत गैरवर्तन झाल्याचेही ते म्हणाले.
यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरोप केला की, राज्यसभेत पहिल्यांदाच खासदारांना मारहाण करण्यात आली, बाहेरून लोकांना बोलावले गेले आणि खासदारांसोबत धक्का-बुक्की करण्यात आली. सभापतीची जबाबदारी सभागृह चालवण्याची असते. विरोधकांची बाजू सभागृहात का ठेवू शकत नाही?
राहुल गांधी म्हणाले, देशाचे पंतप्रधान आज देश विकण्याचे काम करत आहेत. देशाचा आत्मा दोन-तीन उद्योगपतींना विकला जात आहे. विरोधक संसदेत काहीही बोलू शकत नाहीत. देशातील 60 टक्के लोकांचा आवाज दाबला जात आहे, राज्यसभेत खासदारांशी गैरवर्तन करण्यात आले. आम्ही सरकारसोबत पेगासस मुद्द्यावर चर्चा करण्यासंदर्भात बोललो, आम्ही शेतकरी आणि महागाईचा मुद्दा उचलला. तसेच, ही लोकशाहीची हत्या आहे. असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.
जंतर-मंतरवर राहुल गांधी –
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी दिल्लीतील जंतर -मंतरवरही भाषण केले. यावेळी, आज देशात संविधानावर हल्ला होत आहे. नोटाबंदी-जीएसटी लागू करून नरेंद्र मोदी यांनी लघु उद्योग नष्ट केले, ते शेतकऱ्यांवर अत्याचार करतात, देशाच्या संसदेत प्रथमच खासदारांना मारहाण करण्यात आली, असे आरोपही राहुल गांधी यांनी केले.