भाजपच्या नव्या नवनिर्वाचित मंत्र्याबरोबर सम्पपूर्ण देशात जण आशीर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आता त्या पाठोपाठ आम आदमी पक्षाने सुद्धा अशाच यात्रेचे आयोजन केले आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या उपस्थितीत अयोध्येत तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. येत्या १४ सप्टेंबर रोजी अयोध्येत ही तिरंगा यात्रा काढून राष्ट्रवादाचा खरा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याच काम केलं जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.
आम आदमी पार्टी (आप) चे प्रदेशाध्यक्ष सभाजित सिंह यांनी सांगितलं की, “स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ‘आप’ने लखनऊमध्ये हजारो लोकांसह तिरंगा यात्रा काढली होती. या यात्रेला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता आता पक्ष राज्यातील अनेक प्रमुख शहरांमध्ये ही तिरंगा यात्रा काढून त्या माध्यमातून राष्ट्रवादाचा खरा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करेल.
प्रदेशाध्यक्ष सभाजित सिंह म्हणाले की, येत्या २९ ऑगस्टला आग्रा, १ सप्टेंबरला नोएडा तर १४ सप्टेंबरला अयोध्येत तिरंगा यात्रा काढण्यात येईल. या सर्व तिरंगा यात्रांमध्ये उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि राज्यसभा खासदार संजय सिंह सहभागी होतील. या तिरंगा यात्रेच्या माध्यमातून आम्ही खऱ्या राष्ट्रवादाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करू. ते म्हणाले की, सध्याच्या भाजप सरकारने फक्त द्वेष पसरवण्यासाठी आणि लोकांची आपापसात भांडणं लावण्यासाठी जाती-धर्माचं राजकारण केलं आहे.”