उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके भरलेली स्कॉर्पिओ ठेवल्या प्रकरणात तब्बल १३ तासांच्यावर सचिन वाझे यांची NIA कडून चौकशी करण्यात आली होती. अखेर १३ तासांच्या चौकशीनंतर वाझे यांना NIA कडून अटक करण्यात आली. मात्र आता स्फोटके ठेवण्यासाठी वापरण्यात आलेल्या स्कॉर्पिओ गाडीसंदर्भात मोठी माहिती समोर येत आहे.
मिळलेल्या माहितीनुसार ज्या स्कॉर्पिओ गाडीतून अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके ठेवण्यात आली होती ती गाडी चोरीला गेल्याचा प्रथम बनाव करण्यात आला होता. मात्र ती गाडी चोरीला न गेल्याची माहिती आता पुढे येत आहे. ही गाडी अनेक दिवसांपासून वाझे यांच्या ताब्यात होती. तसेच ती चोरीला गेल्याची खोटी तक्रार करायला सांगितल्याचे NIA च्या तपासात उघड झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
आंबानीच्या घराबाहेर सापडलेली स्कॉर्पिओ कार कधीच चोरी झाली नव्हती. कुणाच्या तरी दबावाखाली ही कार चोरी झाल्याची तक्रार विक्रोळी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती, असा NIA ला संशय आहे. वाझेंनी त्यांच्या घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज बेकायदेशीररित्या काढून घेतल्याचंही तपासातून उघड झालं आहे. त्यामुळे वाझे यांचे पाय या प्रकरणात अधिकच खोलात रुतले आहेत.