पुणे | युक्रेनमधून भारतीय विद्यार्थी सुखरूप परत येईपर्यंत पंतप्रधानांनी निवडणुका आणि उद्घाटने बाजूला ठेवावीत आणि आपण फक्त भाजपचे नेते नसून येथील सर्व जनतेचे पंतप्रधान आहात. त्यामुळे केवळ निवडणुकीवर डोळा ठेवून अर्धवट मार्गिकेचे त्यांनी उद्घाटन करू नये. पुण्यात प्रचारार्थ आले तर त्यास तीव्र विरोध करण्याचा इशारा महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे सचिव अक्षय जैन यांनी दिला आहे.
पंतप्रधान मोदी हे देशाचे प्रमुख आहेत की फक्त भाजपचे? युक्रेनमधील संभाव्य युद्ध परिस्थितीची पूर्वकल्पना असूनही वेळीच पावले न उचलल्यामुळे भारतातील वीस हजार विद्यार्थ्यांचे प्राण संकटात आले आहे. त्यातच एका विद्यार्थ्याला प्राणाला मुकावे लागले. एवढेच नव्हे तर पुणे दौऱ्यानंतर पंतप्रधान आता तीन दिवस वाराणसीला निवडणूक प्रचारासाठी तळ ठोकणार आहेत.
याच पार्श्वभूमीवर पंतप्रधानांना देशातील जनतेपेक्षा निवडणुकीत अधिक रस आहे. त्यामुळे देशाच्या पंतप्रधानपदाचे कधी नव्हे एवढे अवमूल्यन झाले आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधानांनी पुण्यातील मेट्रोचे उद्घाटन करू नये तसेच याला विरोध होणार असे जैन यांनी सांगितले.