पश्चिम बंगाल | विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा तृणमूल काँग्रेसने दणदणीत पराभव केल्यानंतर आता पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांच्या पक्ष पुन्हा एकदा भाजपाला जोरदार धक्का देण्याच्या तयारीत आहे. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकूल रॉय, त्यांचा मुलगा सुभ्रांशु रॉय तृणमूलमध्ये घरवापसी करण्याची शक्यता आहे. वृत्तसंस्था एएनआयनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. मुकूल रॉय आज संध्याकाळी ममता बॅनर्जींची पक्ष मुख्यालयात भेट घेतील. या बैठकीला अभिषेक बॅनर्जीदेखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेकांनी तृणमूलला सोडचिट्टी देत भाजपात प्रवेशकेला होता. अनेक आमदारांनी हाती कमळ घेतलं. मात्र तरीही तृणमूलनं २०० हून अधिक जागा जिंकत भाजपाला पराभवाची चव चाखली होती. भाजपमध्ये सत्तेच्या आशेनं गेलेल्या नेत्यांची आता चलबिचल सुरू झाली आहे. अनेक नेते तृणमूलमध्ये परतण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये मुकूल रॉय यांचा क्रमांक वरचा आहे. मुकूल रॉय यांनी सप्टेंबर २०१७ मध्ये तृणमूलला रामराम केला होता. मात्र आता ते तृणमूलमध्ये पुन्हा प्रवेश करू शकतात.
पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत तृणमूलच्या नेतृत्त्वानं मुकूल रॉय यांना सहा वर्षांसाठी निलंबित केलं होतं. यानंतर रॉय यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला. ३ नोव्हेंबर २०१७ रोजी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र निवडणुकीच्या तोंडावर तृणमूलमधून भाजपमध्ये आलेल्या सुवेंदू अधिकारी यांना पक्षात अधिक महत्त्व दिलं जात असल्यानं ते नाराज असल्याचं बोललं जात आहे.