मुंबई | आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते पार पडली. यावेळी त्यांचे पुत्र आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सुद्धा उपस्थित होते. मुख्यमंत्री ठाकरे या महापुजेसाठी काल स्वत: आठ तास ड्रायव्हिंग करत पंढरपुरात दाखल झाले होते. यावरून राज्यातील विरोधी पक्षनेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडायला सुरूवात केली आहे.
शनिवार १७ जूलै रोजी मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे चेंबूरमध्ये काही घरांवर संरक्षक भिंत कोसळली. त्यामध्ये जवळजवळ १७ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेनंतर उद्धव ठाकरे यांनी त्या ठिकाणी येऊन सर्व परिस्थितीचा आढावा घ्यायला हवा होता, असं मत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केलं होत. मात्र उद्धव ठाकरे त्याठिकाणी आले नाहीत त्यामुळे त्यांच्यावर टीका केली जातं आहे.
भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी या संदर्भात आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. शनिवारी ड्रायव्हिंग करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चेंबूर येथे आले असते, तर त्यांच्यासमोर लोटांगण घातलं असतं, असं म्हणत अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.