(मुंबई प्रतिनिधी) अहमदाबादमधील मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने असलेल्या स्टेडियमचे नामकरण नरेंद्र मोदी स्टेडियम असे करण्यात आले आहे. या निर्णयावरून काँग्रेस बरोबर सर्व विरोधकांनी भारतीय जनता पक्षावर आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यात आता राष्ट्र्वादीने सुद्धा यावर टीका केली आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. “स्वातंत्र्य चळवळीतील महान नेते व गुजरातचे सुपुत्र सरदार पटेल यांच्या नावाने मते मागून थकल्यावर त्यांच्या नावे असलेले गुजरात मधील स्टेडियम स्वतःच्या नावावर करून घेतले… हिटलर सत्तेत आल्यानंतर त्याने देखील मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वतःचे नाव दिले होते” असे ट्विट त्यांनी केले आहे.
दरम्यान, नुकतंच बुधवारी जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन करण्यात आले. या स्टेडियमच्या उद्घाटन कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. हे स्टेडियम गृहमंत्री अमित शहा यांच्या मतदार संघात उभारण्यात आले आहे.