मशिदीवरील भोंग्यांच्या विषयावरून पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. पोलिसांच्या भीतीने राज्यातीलत सर्व राजकीय भोंगे गायब झाले, असल्याचे म्हणत त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर निशाणा साधला. तसेच त्यांनी हिंदू समाजातच फूट पाडण्याचा प्रयत्न केला. एकप्रकारे त्यांना हिंदू समाजातच फूट पाडून दंगली घडवायच्या असल्याचा गंभीर आरोपही शनिवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी केला.
संजय राऊत म्हणाले, राज्यातील सर्व राजकीय भोंगे पोलिसांच्या भीतीने गायब झाले आहेत. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. सर्वोच्च न्यायालयाचे जे निर्देश आहेत, त्यानुसार या राज्यात काम होईल. महाराष्ट्रात शांतता आहे. कोणत्याही समाजात कुठेही भांडण नाही, सर्व ठीक आहे. पण लोकांना ही शांतता बघवत नसल्यामुळे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत होते. हिंदू मुस्लीम यांच्यात भोंग्यावरून तणाव तसंच दंगली घडवण्याचे प्रयत्न करण्यात आले. पण, महाराष्ट्रातील सर्व जाती, धर्माच्या लोकांनी त्यांना सणसणीत चपराक लगावली आहे.
तसेच देशात लाऊड स्पीकरबाबत नक्कीच एक धोरण असायला हवे, असे आम्ही आधीही म्हटले आहे. मला वाटते आता केंद्र सरकारला हे धोरण निश्चित करावे लागेल. याबाबत राष्ट्रीय धोरण जाहीर करण्याची मागणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील केली आहे. याप्रमाणे देशासाठी धोरण करून देशाला लागू करा. यात जात-धर्माचा प्रश्न येत नाही. पण, ज्यांनी मशिदीवरील लाऊड स्पीकरचा विषय काढला, त्याचा सर्वात मोठा फटका महाराष्ट्रातील हिंदू मंदिरांना बसल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.