हार्दिक पटेल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात खळबळ
मुंबई : गुजरात काँग्रेसचे युवा नेता हार्दिक पटेल यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली आहे. गुजरात मध्ये झालेल्या स्थानिक निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला होता याच पार्श्वभूमीवर हार्दिक पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली
काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी आज आज सकाळी शरद पवार यांची भेट घेतली होती. सुमारे २० मिनिटं त्यांनी पवार यांच्याशी चर्चा केली. या भेटीची थेट गुजरातपासून मुंबईच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र ह्या भेटीत कोणत्या मुद्द्यावर चर्चा करण्यात झाली याची अधिकृत माहिती मिळलेली नाही .मात्र पुढच्या वर्षी होणाऱ्या गुजरात विधानसभेच्या निवडणुका, आरक्षण हे मुद्दे चर्चेत होते, असे कळते.
दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केल्याने ते प्रकरण सध्या गाजत आहे. याप्रकरणी महाराष्ट्र सरकारने एसआयटी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. याबाबत एक ट्वीट करून हार्दिक यांनी महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले होते व भारतीय जनता पक्षावर टीका केली होती. याबाबतही या भेटीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.