सामना अग्रलेखातून पुन्हा एकदा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर घणाघाती टीका केली आहे. कोल्हापूर ‘उत्तर’ पोटनिवडणुकीत चंद्रकांतदादांनी भाजपचे उमेदवार म्हणून स्वतः ‘शड्डू’ ठोकायला हरकत नव्हती. ‘ईडी’च्या नावाने आरोळ्या तेव्हाही ठोकता आल्या असत्या, पण तसे का झाले नाही? कोल्हापूरच्या जनतेची ‘ईडी’ चौकशी करण्याची त्यांची योजना चांगली आहे. पाच राज्यांत जेथे जेथे भाजपचा विजय झाला, त्या प्रत्येक मतदारसंघातील मतदारांची ‘ईडी’ चौकशी लावाच. गोव्यातील पणजी आणि साखळ मतदारसंघातून सुरुवात करा, म्हणजे सत्य समोर येईल. ” हर हर मोदी, घर घर मोदी” या घोषणेस जोडून कोणी “हर हर ईडी, घर घर ईडी,” अशी घोषणा देत असेल तर लोकांना बंड करावेच लागेल. असा प्रहार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखातून केला आहे.
भारतीय जनता पक्षाचे डोके सुपीक असल्याचे बोलले जाते. याचा अर्थ महाराष्ट्राची मती व माती वांझ आहे असे नाही. कोणतीही निवडणूक जिंकण्यासाठी साम, दाम, दंड, भेद यांचा वापर करायचाच असे या मंडळींनी ठरविलेले दिसते. काँग्रेस आमदाराच्या आकस्मिक निधनामुळे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. लोकशाही मार्गाने निवडणुकीचा जो निकाल लागायचा तो लागेल, पण भाजपच्या प्रांतिक अध्यक्षांनी कोल्हापूरच्या मतदारांना सरळ सरळ धमकावले आहे की, भाजपास मतदान झाले नाही तर तुमच्या मागे ‘ईडी’चा ससेमिरा लावू. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात लक्ष्मीदर्शन होईल व ते डिजिटल माध्यमातून होईल, अशी भीती भाजप पुढाऱ्यांना वाटत असेल तर त्यांनी राज्यातील संबंधित यंत्रणांना सावध केले पाहिजे. असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
भारतीय जनता पक्ष हा जणू सोवळे नेसूनच राजकारण करीत असल्याने निवडणुकीत पैसे वाटप, दाबदबाव अशा पापकर्मांची त्यांना लाज वाटते, पण निवडणुकीतील लक्ष्मीपूजनाबाबत व लक्ष्मीदर्शनाबाबत भाजप पुढाऱ्यांची दिलदार वक्तव्ये पाहिल्यावर श्री. चंद्रकांत पाटील यांच्या बदललेल्या भूमिकेचे आश्चर्य वाटते. पाटलांच्या आधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले रावसाहेब दानवे पैठण येथे नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले व मतदारांना म्हणाले, “निवडणुकीच्या आधी एक दिवस लक्ष्मीदर्शन होत असते आणि अशी लक्ष्मी जर घरी चालून आली तर तिला परत करू नका, उलट तिचे स्वागत करा!” म्हणजे भाजपला निवडणुकीतील लक्ष्मीदर्शनाचे व लक्ष्मीपूजनाचे वावडे नाही.