एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी शरद पवारांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानावर हल्ला केला. यावेळी आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांनी दगडफेक आणि चप्पलफेक सुद्धा केली. या हल्ल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आणि अनेक प्रश्नही उपस्थित करण्यात आले. याच प्रकरणात अटकेत असलेल्या अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्या घरी रविवारी मुंबई पोलिसांनी झाडाझडती घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अॅड गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी अटक केली असून त्यांना कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आज गुणरत्न सदावर्ते यांची पोलीस कोठडी संपत आहे. त्यापूर्वी मुंबई पोलिसांनी सदावर्ते यांच्या घराची झाडाझडती घेतली. दुपारच्या सुमारास मुंबई पोलिसांचे पथक सदावर्ते यांच्या घरी दाखल झाले आणि कागदपत्रांची छाननी केली. ही झाडाझडती रात्री नऊपर्यंत सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
सदावर्ते यांच्या पाठीमागे इतर कुणी व्यक्ती, राजकीय कनेक्शन असल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्याच अॅँगलने तपास मुंबई पोलीस करत असल्याची माहिती समोर येत आहे. आता कोर्टात हजर केल्यानंतर सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीत आणखी वाढ करण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार आहे आणि त्यासाठी पोलिसांकडून आणखी काही ठोस पुरावे गोळा करत असल्याचं बोललं जात आहे. गुणरत्न सदावर्तेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना 8 एप्रिल रोजी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि चौकशीनंतर अटकेची कारवाई केली.
जमावाला भडकवणे, कट रचणे या गुन्ह्या अंतर्गत वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली आहे. चौकशीनंतर पोलिसांनी सदावर्ते यांना अटक केली आहे. त्यानंतर 9 एप्रिल रोजी त्यांना कोर्टात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुणरत्न सदावर्ते यांना कोर्टाने 11 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.