राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या बंगल्यावर ८ एप्रिल रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेकही केली होती.यानंतर पोलिसांनी आंदोलक कर्मचाऱ्याचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना व आंदोलक कर्मचाऱ्यांना शुक्रवारी रात्री अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने सदावर्तेंना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
दरम्यान सोमवार न्यायालयाने त्यांच्या कोठडीत १३ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. महाराष्ट्र एस टी कामगार सेना संघटनेचे कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी अकोट पोलिसात सदावर्ते, त्यांची पत्नी आणि दोन जणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. अकोट पोलिसांनी आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल केल्याची माहिती आहे.
मागील पाच महिन्यापासून एसटी कर्मच्याऱ्यांचा संप सुरु आहे. या संपादरम्यान कर्मचारी पदाधिकारी हे वेगवेगळ्या लोकांमार्फत आर्थिक शोषण करुन संपकरी कर्मचाऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच राज्यभरातील जवळपास ७०,००० एस टी कर्मचाऱ्यांकडून गोळा केलेली रक्कम 3 करोड रुपये असल्याचा अंदाज असून, याचे पुरावे तक्रारदार विजय मालोकार यांनी पोलिसांना दिले आहेत.