गुजरात | गुजरातमध्ये इंदिरा गांधी यांच्या नावावर असलेली एक इमारत तोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने एक भवन बनवण्याची तयारी सुरू आहे. यासाठी प्रस्ताव पारित झाला असून मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांच्याकडे हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्यांनी संमती दिल्यानंतर या इमारतीचे काम सुरू होणार आहे गुजरात सरकारच्या या निर्णयामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये इंदिरा गांधी प्रशिक्षण भवन तोडून नवी इमारत बनवण्याचा प्रस्ताव आहे. तसेच नव्या इमारतीला नरेंद्र मोदी यांचे नाव देण्याचेही या प्रस्तावात म्हटले आहे. गुजरत पंचायत परिषद बैठकीत हा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. ही वास्तू जुनी झाली असून ती तोडून नवी इमारत बांधण्याची मागणी या प्रस्तावात करण्यात आली आहे.
परिषदेच्या बैठकीत हा प्रस्ताव पारित झाल्यानंतर या प्रस्तावाची फाईल मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांच्याकडे पाठवण्यात आली आहे. मुख्यमंत्री पटेल यावर आता निर्णय घेणार असून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाही या प्रस्तावाबद्दल सांगण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना या प्रस्तावाबद्दल माहिती दिल्यानंतर परिषदेचे एक शिष्टमंडळ पंतप्रधान मोदीं यांचीही भेट घेणार आहेत.