गोवा विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याच्या दोन दिवस आधी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय. भारतीय जनता पक्षाने (भाजप) सरकार स्थापनेसाठी बहुमताचा आकडा ओलांडला नाही तर. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाकडून (एमजीपी) पाठिंबा मिळविण्यासाठी पक्षाचे केंद्रीय नेतृत्व आधीच चर्चा करत आहे. असं वक्तव्य त्यांनी केलंय.
गोव्यात 40 विधानसभेच्या जागांसाठी 14 फेब्रुवारी रोजी मतदान झाले. आता 10 मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहेत. एक्झिट पोलमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये कांटे की टक्कर दिसत आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून ही काँग्रेसला सत्ता स्थापन करता आली नव्हती. पण यंदा काँग्रेसकडून अधिक सावधता बाळगली जात आहे. आमदार फुटू नयेत म्हणून काँग्रेस अधिक काळजी घेत आहेत.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, भाजपला 21 जागांच्या बहुमताच्या आकड्यापेक्षा जास्त जागा मिळतील अशी आशा आहे पण जर संख्या कमी पडली तर, “पक्षाने अपक्ष आणि एमजीपीकडून पाठिंबा मिळविण्याचा पर्यायही खुला ठेवला आहे.” केंद्रीय भाजपचे नेतृत्व एमजीपीसोबत निवडणुकीनंतरच्या युतीसाठी चर्चा करत आहे.
2017 च्या विधानसभा निवडणुकीत, काँग्रेस 17 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला, परंतु 13 जागा जिंकणाऱ्या भाजपने दीपक ढवळीकर यांच्या नेतृत्वाखालील MGP, गोवा फॉरवर्ड पार्टी आणि अपक्ष यांच्यासोबत आघाडी करून मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले.
मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर 2019 मध्ये प्रमोद सावंत मुख्यमंत्री झाले तेव्हा एमजीपीच्या दोन मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले होते. यावेळी एमजीपीने ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेससोबत आघाडी करून विधानसभा निवडणूक लढवली आहे.