मुंबई : पंढरपूर मंगळवेढा पोट निवडणुकीत समाधान अवताडे यांच्या प्रचारादरम्यान आघाडी सरकार अस्थिर असल्याचे भाष्य विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. आता त्यांच्या या विधानाचा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
देवेंद्र फडणवीस जेव्हा सरकार पाडतील तेव्हा आम्ही त्यांचं अभिनंदन करु असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. ते आज मुंबईत पत्रकार माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना फडणवीसांच्या टीकेसंदर्भात विचारण्यात आले तेव्हा त्यांनी हे विधान केले होते.
देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला दिलेल्या इशाऱ्याने प्रत्यक्ष विठोबा माऊलीसुद्धा सावध झाली असेल. विठोबा माऊलीचा आशीर्वाद महाविकास आघाडी सरकारला आहे. माऊलीचा आशीर्वाद नसता तर हे सरकार आलंच नसतं. त्यांनी जर विठोबा माऊलीला साकडं घातलं असेल तर विठोबा माऊली पाहील ना, असे मत संजय राऊत यांनी मांडले.
मंगळवेडाची किंवा पंढरपूरची पोटनिवडणूक आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तिथे प्रचारासाठी गेलेत. त्यांनी प्रचार करावा. जनता जो काही निर्णय घ्यायचाय तो निर्णय घेईल. पण एक सांगतो, विरोधी पक्षाला अशाप्रकारची भाषणं करावी लागतात. देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांना लोकांमध्ये विश्वास आणण्यासाठी किंवा त्यांचे आमदार एकत्र ठेवण्यासाठी अशा प्रकारची भाषणं करावी लागतात.
तसेच याप्रकारची भाषण आम्हीसुद्धा केली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील केली आहेत. राजकारणात अशा भाषणांना जेवढं महत्त्व द्यायचं ते तेवढंच द्यायचं. ते सरकार जेव्हा पाडतील तेव्हा आम्ही त्यांचं अभिनंदन करु”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.