पाच राज्यांच्या निवडणुकीपैकी चार राज्यांत भाजप आघाडीत आहे. त्यात युपीत भाजपला बहुमत मिळाले असून भाजप २७० जागांवर आघाडीवर आहे. तर समाजवादी पक्ष १२१ जागांनी दुसऱ्या स्थानावर आहेत.देशभर भाजप कार्यकर्त्यांकडून आज जल्लोष करण्यात येत आहे. यावरच भाजप नेते नितेश राणे यांनी मात्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
“खूप दुःखदायक, गोवा आणि युपीत ‘म्याव म्याव’ चा आवाज ऐकू नाही आला. खूप दुःख झाले.”, असे खोचक ट्वीट करत राणे यांनी आदित्य ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. दरम्यान गोव्यात भाजप १९ जागांवर आघाडीवर आहे. भाजपचे चार उमेदवार गोव्यात विजयी झाले आहेत.
दरम्यान गोव्यात भाजप पक्ष आघाडीवर असून भाजप-काँग्रेस मध्ये चुरशीची लढत बघावयास मिळत आहे. गोव्यात उत्पल पर्रीकर यांचा पराभव झाला आहे. तर मुख्यमंत्री प्रमोद सावंत पिछाडीवर आहेत. मात्र युपीत भाजपने मोठी कामगिरी केली आहे. या दोन्ही राज्यांत आदित्य ठाकरे तसेच संजय राऊत यांनी मोठा दावा केला होता. आदित्य ठाकरे यांनी गोव्यात सभाही घेतल्या होत्या. मात्र येणारे निकाल प्रचंड निराशादायक ठरत आहे. यावरूनच भाजप सेनेवर टीका करत आहे.