मुंबई | गोवा विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले यातना तेथील स्थानिक वातावरण चांगलेच तापू लागले आहे. याच मुद्द्यावरून आता आजच्या सामना अग्रलेखातून जोरदार टीका केली आहे. देशात गोवंशहत्या बंदी कायदा लागू आहे, पण गोव्यात हवे तितके बीफ म्हणजे गोमांस मिळत आहे, हे ढोंग नाही तर काय?,’ असा सवाल शिवसेनेनं केला आहे.
‘गोव्यात रोजगाराचा प्रश्न भेडसावतो आहे. कोरोनामुळे पर्यटनावर संकट कोसळले व अर्थकारण बिघडले. लोकांच्या चुली थंडावल्या आहेत. त्याच वेळी अमली पदार्थाने अनेक गावांना, समुद्रकिनाऱ्यांना विळखा घातला आहे. कॅसिनो जुगाराच्या बोटी सरकारला खंडणी देतात. त्या खंडणीवर गोव्यासारखे देवांचे राज्य चालवले जात असेल तर तो हिंदुत्वाचा अपमानच म्हणावा लागेल. कॅसिनो जुगाराविरुद्ध लढा देऊन मनोहर पर्रीकरांनी भाजपला गोव्याला रुजवले. तेच भाजप सरकार आज कॅसिनो मालकांचे गुलाम बनले आहे अशी टीका शिवसेनेनं केली आहे.
मुख्यमंत्री सावंत सांगतात, गोव्यातील प्रत्येक गाव म्हणे स्वयंपूर्ण करणार. तरुणांना अमली पदार्थांचे व्यसन लावून, जुगाराची चटक लावून तुम्ही गोव्याला स्वयंपूर्ण कसे काय बनविणार ते सांगा. गोव्यातील मुली सुरक्षित नाहीत. सिद्धी नाईक प्रकरण संपलेले नाही व कलंगुट समुद्रकिनाऱ्यावर ज्या अवस्थेत तिचा मृतदेह सापडला त्यातून अनेक प्रश्न निर्माण झाले. राजकारण्यांना गोव्याच्या खऱ्या प्रश्नांची जाण उरली आहे काय? गोव्याच्या राजकारणात कोण कोठे जाईल व कोणाच्या गळास कोणता मासा लागेल याचा भरवसा नाही असा टोलाही शिवसेनेनं लगावला आहे.