मुंबई | अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियनबाबत बदनामीकारक विधाने करून दिशाभूल केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे व त्यांचे पुत्र नीतेश राणे यांना दिंडोशी सत्र न्यायालयाने १० मार्चपर्यंत अटकेपासून अंतरिम दिलासा दिला आहे. मात्र दुसरीकडे नारायण राणे आणि नितेश राणे यांनी मालवणी पोलीस ठाण्यात हजेरी लावली. यापूर्वी नितेश राणे यांनी एक ट्विट करत सूचक वक्तव्य केले आहे. न्याय मिळेल, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दिशा सालियन प्रकरणात गुन्हा दाखल झालेले भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे सुपूत्र नितेश राणे यांचा आता पोलिसांकडून जबाब नोंदवला जाणार आहे. नितेश राणे यांनी एक सूचक ट्विट केले आहे. खेल आपने शुरू किया है, खतम हम करेंगें. न्याय मिलेगा!, असे नितेश यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. या ट्विटमधून नितेश राणे यांना ठाकरे सरकारला एकप्रकारे इशारा दिल्याची चर्चा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
अटकेच्या भीतीने नारायण राणे व नीतेश राणे यांनी दिंडोशी सत्र न्यायालयात ॲड. सतीश मानेशिंदे यांच्याद्वारे अटकपूर्व जामीन अर्ज केला. या अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली. न्यायालयाने राणे पिता-पुत्रांना अटक न करण्याचे निर्देश देत विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांना उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले.