अंबानी घराजवळील स्फोटके आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी NIA ने सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर सत्तधारी आणि विरोधक पक्षांमध्ये याच मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या सुरु झाल्या होत्या. त्यामुळे येणाऱ्या दिवसात हे प्रकरण आणखी गाजणार आहे अशीच शक्यता राजकीय वर्तुळात बोलून दाखवली जात आहे.
त्यात मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सीडीआर (कॉल रेकॉर्ड डिटेल्स) च्या आधारे पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर आरोप केले होते. आता त्याच ‘सीडीआर’वरून काँग्रेसने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जोरदार टीका केली आहे.
महाराष्ट्राचे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी या संदर्भात ट्विट केले आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, ‘देवेंद्र फडणवीस यांनी CDR ची माहिती तपास यंत्रणांकडे द्यावी व गुन्हेगारांना शिक्षा करण्यास मदत करावी. नागरिक म्हणूनही तपास यंत्रणांना स्त्रोत सांगणं त्यांचं कर्तव्य आहे असे सावंत यांनी म्हटलं आहे.
तसेच ‘सीडीआर मिळवणं हा गुन्हा आहे. काही दिवसांपूर्वी क्राईम ब्रँचने सीडीआर रॅकेट उघडकीस आणले होते, असे सांगून, फडणवीस यांनी गुन्हा केल्याचा आरोप सावंत यांनी अप्रत्यक्षपणे केला आहे. त्यासाठी त्यांनी काही बातम्याची कात्रणंही सचिन सावंत यांनी ट्वीट केली आहेत. या आरोपांवर आता भाजपा काय उत्तर देते हे पाहावे लागणार आहे.
