मुंबई | अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खानला एका क्रुझवरील छापेमारीत ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली होती. मात्र दुसरीकडे एनसीबीने केलेल्या या कारवाईवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यानंतर तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप मंत्री नवाब मलिकांनी केले. या प्रकरणी काही लोकांनी पुढे येत आर्यन खानला अडकवून शाहरुखकडून पैसे काढण्याचा कट रचला होता असा आरोप केला. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष तपास पथक नेमलं होतं.
आता नवनियुक्त मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी या प्रकरणी विशेष तपास पथकाला पुन्हा चौकशी सुरू करण्यास सांगितले असल्याची बातमी एका वृत्तपत्राने दिली आहे. त्यावरून भाजपा नेते मोहित कंबोज यांनी मुंबई पोलीस आयुक्तांच्या निर्णयाचं स्वागत केले आहे. मुंबई पोलिसांची SET या प्रकरणात खंडणीच्या आरोपांची चौकशी करत आहे.
या प्रकरणावर मोहित कंबोज म्हणाले की, मुंबई पोलीस आयुक्तांनी या प्रकरणात तपास करून एफआयआर दाखल करण्यात यावा. मला कधीही चौकशीसाठी बोलवा. माझ्याकडे याचे सगळे पुरावे आहेत. सलीम जावेदची स्टोरी बनवली गेली. आजच्या अधिवेशनातही काहीजण बसलेले आहे. हे देशासमोर उघड व्हायला हवं असं त्यांनी सांगितले.
तसेच सुनील पाटील, किरण गोसावी, प्रभाकर साईल, शिवसेनेचा एक मंत्री, काँग्रेसचे असे कुठले मंत्री आहेत? त्यांची या प्रकरणात काय भूमिका आहे? परेळच्या घटनेत कुणी समन्वय केला? याच्या अनेक चर्चा झाल्या परंतु हे प्रकरण दाबलं गेले. हे सत्य देशासमोर यायला हवं. काही लोकांचे जबाब नोंदवण्यात आले नाही. कोर्टासमोर जे प्रतिज्ञापत्र सादर केले आणि जे सत्य आहे त्यात काय अंतर आहे? लोकांना खरं कळायला हवं. गुन्हेगारांना वाचवू नका अशी मागणी मोहित कंबोज यांनी केली आहे.