टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेना नेते संजय राठोड यांचे नाव पुढे आले होते. तसेच विरोधकांकडून त्यांच्यावर आरोप जोरदार लावण्यात आले होते. यावर आता संजय राठोड यांनी आज पोहरादेवीच्या दर्शनानंतर प्रतिक्रिया देत सर्व आरोपांचे खंडन केले आहे. मात्र राठोड यांच्या समर्थकांनी केलेल्या गर्दीवरून विरोधकांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. आता या झालेल्या गर्दीवरून भाजपा नेते आणि माजी खासदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टोला लगावला आहे..
राणे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, “शिवजयंतीला शिवनेरीवर १४४ कलम लावणारे ठाकरे सरकारला पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संशयाच्या घेऱ्यात असलेले संजय राठोड अचानक बिळातून बाहेर आले आणि गर्दी करून फिरले. त्यावेळी महाभकास आघाडीला कोरोनाची भिती वाटली नाही. ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना सगळं माफ आहे” अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे.
पोहोरादेवीगडावर दर्शन घेतल्यानंतर त्यांनी अचानक पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषद दहा ते बारा मिनिटे एवढीच चालली. पण पत्रकार परिषदेची सुरुवातच त्यांनी पूजा चव्हाणचे नाव घेऊन केली. ते म्हणाले, पूजा चव्हाण ही आमच्या गोर बंजारा समाजातील तरुणी होती आणि तिचा पुण्यात अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्याचं आमच्या गोर बंजारा समाजाला अत्यंत दु;ख झालं आहे तसेच राठोड यांनी यावेळी विरोधकांनी लावलेल्या आरोपाचे खंडण केले होते. मात्र ही पत्रकार परिषद झालेल्या गर्दीमुळे चांगलीच गाजली होती.