नवी दिल्ली | काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट ट्विटरने लाॅक केलं होतं. त्यानंतर ट्विटरने कारवाईची धडक मोहीम सुरू केली होती. तसेच ट्विटरने आणखी मोठी कारवाई करत काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवर देखील कारवाई केली होती.त्यानंतर आता लाॅक करण्यात आलेले सर्व अकांऊट अनलाॅक करण्यात आले आहेत.
मागील आठवड्यात राहुल गांधी यांनी बलात्कार पिडीत कुटूंबाची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी त्याचा फोटो ट्विटवर शेअर केला होता. हा फोटो नियमबाह्य असल्याचा दावा करत ट्विटरने राहुल गांधी यांच्या अकाऊंटवरून फोटो डिलिट केलं होतं तसेच अकाउंट ब्लॉक केले होते.
राहुल गांधी यांचं अकाऊंट लाॅक केल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत त्यांचं अकाऊंट अनलाॅक करण्याची मागणी केली होती. तर केंद्र सरकारच्या दबावामुळे ट्विटरने कारवाई केल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. त्यानंतर काँग्रेस पक्षाचं अधिकृत ट्विटर अकाऊंट देखील लाॅक करण्यात आलं. त्याचबरोबर काँग्रेसच्या काही नेत्यांंचं देखील अकाऊंट लाॅक केलं गेलं.
त्यातच आता आठवड्याभराने राहुल गांधी, काँग्रेसचं अधिकृत अकाऊंट आणि नेत्याचं अकाऊंट पुन्हा सुरू करण्यात आलंं आहे. मागील काही दिवसांत ट्विटरने मोठ्या कारवाई करत ५० हजारांहून अधिक नेटकऱ्याचं अकाऊंट लाॅक केलं आहे.