मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके भरलेली स्कॉर्पिओ ठेवल्या प्रकरणात तब्बल १३ तासांच्यावर सचिन वाझे यांची एनआयए’कडून चौकशी करण्यात आली होती. अखेर १३ तासांच्या चौकशीनंतर वाझे यांना एनआयएकडून अटक करण्यात आली होती तसेच वाझे यांना पोलीस खात्यातून निलंबित करण्यात आले आहे.
आता त्या पाठोपाठ या वाझे आणि शिवसेना पक्षात असलेल्या संबंधामुळे महाविकास आघाडी सरकार सावध झाल्याचे दिसत आहे. काही वेळापूर्वीच वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र या भेटीदरम्यान कोणत्या विषयावर चर्चा झाली यावर अदयाप माहिती समोर आलेली नाही,
मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार साधारण १२ वाजण्याच्या सुमारास वर्षा बंगल्यावर दाखल झाले. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास पाऊणतास चर्चा सुरु होती. या भेटीत सचिन वाझे आणि NIA चा तपास या दोन विषयांवर चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तसेच याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांची दुपारी ४:०० वाजता बैठक बोलावली आहे. या बैठकीचे कारण मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा असे सांगितले असले तरी या बैठकीत सचिन वाझे प्रकरणावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

