प्रक्षोभक वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे उत्तर प्रदेशातील गझियाबाद येथील यती नरसिंहानंद सरस्वती यांच्याविरुद्ध नगरच्या न्यायालयात खासगी तक्रार दाखल करण्यात आली आहे. माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्याविरुद्ध वादग्रस्त व्यक्तव्य, तसेच धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य केल्याचा आरोप करीत सामाजिक कार्यकर्ते बहिरनाथ वाकळे, आर्किटेक्ट अर्शद शेख, अनंत लोखंडे यांनी ही तक्रार दाखल केली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार नगर येथील न्यायालयात गुरुवारी ही तक्रार दाखल करण्यात आली. अतिरिक्त मुख्य न्यायाधीश तेजस्विनी निराळे यांच्यासमोर यावर प्राथमिक सुनावणी झाली. अॅड. असीम सरोदे यांनी तक्रारदरांतर्फे युक्तिवाद केला. धर्मांध, द्वेषपूर्ण विधाने करून राष्ट्रीय एकात्मता दूषित करून धर्माच्या आधारे तेढ निर्माण करणार्या यती नरसिंहानंद सरस्वती यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
सदर तक्रारीत म्हटले आहे की, यती नरसिंहानंद सरस्वती हे सातत्याने व्हिडिओ व्हायरल करून दोन धर्मात द्वेष निर्माण होईल अशा पद्धतीने वक्तव्य करीत आहेत. त्यांनी देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करून त्यांनाच देशद्रोही ठरविण्याचा प्रयत्न चालवला आहे.
या संदर्भात तक्रारदारांनी तोफखाना पोलीस स्टेशनला नरसिंहानंद सरस्वती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. पोलीस अधीक्षकांनाही निवेदने देण्यात आली. मात्र त्यांच्याकडूनही कारवाई झालेली नाही. त्यामुळे न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.