मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित संस्थांवर प्राप्तिकर विभागाने अलीकडेच टाकलेल्या धाडीतून १७ कोटी रुपयांचे उत्पन्न लपविल्याचे समोर आले असल्याचा दावा प्राप्तिकर खात्याने केला आहे. या माहितीमुळे राजकीय वर्तुळात एकाच खळबळ उडाली असून यावर वेगवेगळे तर्कवित्रक लावले जात आहे.
१७ सप्टेंबर रोजी नागपूर, मुंबई, दिल्ली आणि कोलकाता येथे ३० ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. सीबीआय आणि ईडीकडून देशमुख यांची चौकशी सुरु आहे. सीबीडीटीने म्हटले आहे की, या व्यावसायिक समूहाचे नागपूर आणि महाराष्ट्रात शिक्षण, कृषी क्षेत्रात व्यवसायाशी संबंधित उलाढाली आहेत. तपासात कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे मिळाले असून ते जप्त करण्यात आले आहेत.
सर्व पुरावे बेहिशेबी वित्तीय देवाणघेवाण दाखवितात. असे पुरावे अनेक आर्थिक वर्षांचे सापडले आहेत. ही रक्कम १२ कोटी रुपयांपेक्षा अधिक होती. ट्रस्टने पावत्या लपविण्यासह ८७ लाखांचे पेमेंट नगदी केले आहेत. हे पूर्णपणे बेहिशेबी आहे, असेही यात म्हटले आहे. या माहितीमुळे भविष्यात अनिल देशमुख यांच्या अडचणी अधिक वाढताना दिसून येणार आहे.