माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारवर सचिन वाझे प्रकरणावरून जोरदार आरोप लगावले होते. यावेळी त्यांनी वाझे यांना सेवेत पुन्हा घेण्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दबाव आणला होता असा खळबळजनक आरोप फडणवीसांनी केला होता. आता फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपांना राष्ट्र्वादीने सुद्धा सडेतोड उत्तर दिले आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते असताना त्यांच्या अनेक निर्णयावर आता राष्ट्र्वादीने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच राष्ट्रीय स्वसंघाशी निवडीत फडणवीसांवर आरोप करण्यात आले आहे. या संदर्भात राष्ट्रवादीकडून ट्विट करण्यात आले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री कार्यालयात नेमलेल्या रास्वसंघाशी संबंधित सात विशेष कार्य अधिकाऱ्यांच्या वेतनावर दरमहा ७,७०,००० रु खर्च होत होते.त्याहून महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयाचे कामकाज सरकारबाहेरील खासगी लोकांकडे देऊन त्यांनी सरकारी गोपनीयता धाब्यावर बसवली होती. असे ट्विट करण्यात आले आहे.
तसेच पुढे आणखी एक ट्विट करून आपल्याच मंत्र्यांवर नजर ठेवण्याचा आरोप राष्ट्र्वादीने फडणवीसांवर केला आहे. या संदर्भात ट्विट करताना लिहिले आहे की, देवेंद्र फडणवीस यांनी माहिती महासंचालकपदावर पोलिस खात्यातील, त्यातही सायबर गुन्हे शाखेच्या ब्रिजेश सिंह यांना आणून आपल्याच सरकारमधील मंत्र्यांवर पाळत ठेवण्याचे उद्योग केले होते. तेच आता पोलिस अधिकाऱ्यांच्या गैरवापरावर प्रवचने झोडत आहेत. असे ट्विट केले आहे.