मुंबई | राज्यातील पोलिसांच्या बदल्यांसाठी मंत्री अनिल परब आणि राष्ट्रवादीचे नेते आणि तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात सह्याद्री अतिथीगृह आणि ज्ञानेश्वरी बंगल्यावर गुप्त बैठका व्हायचा, असा खळबळजनक खुलासा देशमुख यांचे विशेष कार्य अधिकारी रवी व्हटकर यांनी केला आहे.व्हटकर यांनी सक्तवसूली संचालनालयाकडे नोंदविलेल्या जबाबात ही माहिती दिली आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर केलेल्या पोलिसांना १०० कोटींच्या वसूलीच्या आरोपांवरून एकच खळबळ उडाली होती याच पार्श्वभूमीवर गंभीर आरोपांसह भ्रष्टाचार व गैरकारभाराच्या आरोपांवरुन गुन्हा दाखल करुन ईडी तपास करत आहे. यात देशमुख यांच्या गृहमंत्री असल्याच्या काळात झालेल्या पोलीस बदल्यांबाबत ईडीने देशमुखांच्या दोन्ही स्वीय सहायकांसह गृहमंत्रालयातील अधिकाऱ्यांचे जबाब नोंदविले आहेत. यात देशमुख यांचे विशेष कार्य अधिकारी रवी व्हटकर यांनी ईडीकडे नोंदविलेल्या जबाबाचा समावेश आहे.
व्हटकर यांनी ईडीला दिलेल्या जबाबानुसार, पोलीस आस्थापन मंडळ हे केवळ नावापूरते आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय हा आधीच घेतला जात होता. राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्यांपूर्वी देशमुख आणि परब यांच्यात सह्याद्री अतिथी गृह व ज्ञानेश्वरी बंगल्यावर गुप्त बैठक व्हायची. या बैठकीला माझ्यासह देशमुख यांचे स्वीय सहायक संजीव पालांडे हेसूद्धा उपस्थित असल्याचे व्हटकर यांनी स्पष्ट केले आहे.