राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्धा तापत असताना याचे पडसाद आता दिल्लीतही दिसू लागले आहे. त्यातच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारसह केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंवर जोरदार टीका केली.
आम्हाला अभ्यास शिकवू नका. आधी मराठ्यांना आरक्षण द्या. मग आम्हाला शिकवा, असा हल्ला चढवतानाच मराठा आरक्षणावर आम्ही रावसाहेब दानवेंचं कोचिंग करू, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. काही दिवसांपूर्वी दानवे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आघाडी सरकारवर जोरदार हल्लबोल केला होता. या टीकेला संजय राऊत यांनी प्रतिउत्तर दिले आहे/
संजय राऊत यांच्या निवासस्थानी शिवसेना खासदारांची आज बैठक पार पडली. यावेळी राऊत यांनी मराठा आरक्षणावरून केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली. महाराष्ट्रातील काही प्रश्न आहेत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत आले होते. त्यांनी पंतप्रधानांना ११ मागण्यांचं निवेदन दिलं आहे. त्यातील अनेक प्रश्न महाराष्ट्राच्या विकासाच्या संदर्भातील आहेत.
तसेच काही सामाजिक प्रश्न आहे. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाशी संबंधित आहेत. रेल्वे मेट्रो, जीएसटी परतावा, पीक विमा प्रश्न आहे. या सर्व विषयांना चालना देण्यासाठी खासदारांनी एकत्र प्रयत्न करावेत. त्या त्या खात्याच्या मंत्र्यांना भेटून पाठपुरावा करण्यासाठी ही बैठक झाली. आता या ११ मागण्यांवर आम्ही पुढील आठवड्यापासून पाठपुरावा करणार आहोत, असं राऊत म्हणाले.