एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी मागच्या दोन आठवड्यापासून एसटी कर्मचारी आंदोलन करत आहे. तर दुसरीकडे राज्य सरकार आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यातच अद्याप एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याचे नाव घेत नसून आज महामंडळाने अखेर २३८ रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. तर शुक्रवारी महामंडळाने संपात सहभागी २९७ कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून एकूण निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या २७७६ इतकी झाली आहे.
२७ ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून संप मिटण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने महामंडळाने संप मोडायच्या हालचाली चालू केल्या आहेत. एसटी महामंडळाने संपात सहभागी रोजंदारी कामगारांना २४ तासांत कामावर हजर व्हा अन्यथा सेवा समाप्त करण्यात येईल, अशा कारणे दाखवा नोटीस बजावल्या होत्या.
महामंडळाने रोजंदारीवर काम करणाऱ्या २२९६कर्मचाऱ्यांना २४ तासांत कामावर येण्याची नोटीस बजावली होती. त्यापैकी २३८ रोजंदारी कामगारांना आज अखेर त्यांची सेवा समाप्त झाल्याचे सांगण्यात आले आहे. तर आज २९७ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे निलंबित झालेल्या कामगारांची एकूण संख्या आता २७७६ इतकी झाली आहे. दरम्यान, सायंकाळी ६ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार महामंडळाने विविध मार्गांवर १३१ बसेसद्वारे ३५१७ प्रवाशांची वाहतूक केली आहे.