औरंगाबाद | औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्न पेटला असतानाच भाजपाकडून आज विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भव्य असा मोर्चा काढला जाणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप-शिवसेना समोर आली आहे. तर भाजपकडून काढण्यात येणाऱ्या मोर्च्यावरून शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. निवडणुकींच्या आचारसंहितेच्या वेळेस फसवी योजना मंजूर करून राजकारण करणारे आज मोर्चा काढत असल्याची टीका दानवे यांनी केली आहे. याबाबत दानवे यांनी फेसबुक पोस्ट करून भाजपवर टीका केली आहे.
फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज निघणाऱ्या मोर्च्यापूर्वी भाजपवर टीका करताना दानवे म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस साहेब पाच वर्षे मुख्यमंत्री असताना औरंगाबाद शहरासाठी आचारसंहितेच्या वेळेस फसवी पाणी योजना मंजूर करून राजकारण करणारे आज मोर्चा काढत आहेत. केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड दोन वेळेस महापौर आणि एक वेळेस उपमहापौर असताना पाणी योजनेसाठी काहीही न केलेले आज मोर्चा काढत आहेत.
सिडको-हडकोसाठी असलेल्या एक्सप्रेस लाइन चे पाणी वळवणारे आज मोर्चा काढत आहेत. बापू घडामोडे २०१६ मध्ये महापौर असताना, शहरात, राज्यात, केंद्रात गल्ली ते दिल्ली भाजपची सत्ता असताना शहराच्या पाणी योजनेसाठी काहीही न केलेले आज मोर्चा काढत आहेत. आजीवन माजी उपमहापौर पदवी लावून शहरात फिरणारे आणि पाण्यासाठी काहीही न केलेले भाजपचे नेते फक्त राजकारण करण्यासाठी आज मोर्चा काढत आहेत.