केंद्राने पारित केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी मागच्या सात महिन्यापासून दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत असून अद्याप केंद्राने यावर तोडगा काढलेला नाही. या आंदोलनाला देशभरात शेतकरी संघटनांच्या बाजूने उभे राहत अनेकांनी सरकारविरोधात निषेध व्यक्त केला होता.
तशाच प्रकारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही केंद्र सरकारला आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र आंदोलन काही झालं नाही. याच पार्श्वभूमीवर इंडिया अगेन्स्ट करपशनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी अण्णा हजारेंवर निशाणा साधला आहे.
अण्णा हजारे यांनी ‘शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर आंदोलन करु’ असे सांगितलं होतं पण भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी राळेगणसिद्धी येथे भेटुन गेले की अण्णा हजारेंनी भूमिका बदलली असा आरोप हेमंत पाटील यांनी लगावला आहे. हेमंत पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे मते मांडली आणि अण्णा हजारे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.