रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या रविवारी झालेल्या भाषणांच्या वेळे’ची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. फडणवीस आणि राज ठाकरे यांनी एकमेकांना व्यवस्थित मीडिया कव्हरेज मिळेल, या हिशेबाने आपापल्या भाषणांची वेळ ठरवल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी जयंत पाटील यांनी म्हटले की, मुंबईत भाजपच्या बुस्टर सभेत देवेंद्र फडणवीस यांचे भाषण संपले आणि त्यानंतर राज ठाकरे औरंगाबादमधील स्टेजवर भाषणासाठी व्यासपीठावर चढले. फडणवीस आणि राज ठाकरे या दोघांकडूनही भाषणाबाबत पूरक टायमिंग साधून टीव्ही मीडिया व्यापून घेण्याचा प्रयत्न अचूक झाला. यातून भाजप आणि मनसेची मिलीभगत आहे हे सिद्ध होतेय, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादेत जंगी सभा होती. तर मुंबईत देवेंद्र फडणवीसांची बुस्टर डोस सभा होती. या दोघांच्या सभा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या होत्या आणि त्यांची वेळही आसपास होती. राज ठाकरे साडेसात वाजता या सभेला पोहोचणार होते. मात्र, त्यांना पोहोचायला १५-२० मिनिटे उशिर झाला. राज ठाकरे ७ वाजून ५३ मिनिटांच्या सुमारास व्यासपीठावर पोहोचले. त्यानंतर त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि ८ वाजून ३ मिनिटांनी राज ठाकरे भाषणासाठी पोडियमवर उभे झाले. तोपर्यंत मुंबईतील देवेंद्र फडणवीसांचे भाषण संपले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात फडणवीस आणि राज ठाकरेंच्या या टायमिंगची चर्चा रंगली होती.