पणजी | गोवा विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच पक्षाने कंबर कसली आहे. त्यातच आता काँग्रेस पक्षाला जोरदार धक्का या नेत्याने दिला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार व माजी मुख्यमंत्री लुइझिन फालेरो यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा सभापती राजेश पाटणेकर यांच्याकडे सादर केला आहे.
लुइझिन म्हणाले की,’तब्बल २० दिवस चिंतन केल्यानंतरच मी हा निर्णय घेतलेला आहे. गोव्याच्या विकासासाठी आणि लोकांच्या सेवेसाठी मी हे पाऊल उचलले आहे. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्र्जींचा फॉर्म्युला प्रधानमंत्री मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर भारी पडला. गोव्यात भाजपचा पाडाव करण्यासाठी अशाच लढतीची गरज आहे.’ ते पत्रकारांशी बोलत होते.
२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे १७ आमदार निवडून आले होते. विधानसभेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष होता. कालांतराने काग्रेसला गळती लागली. जुलै २०१९ मध्ये दहा काँग्रेसी आमदार फुटून भाजपवासी झाले. त्याआधी दोघे फुटले होते. काँंग्रेसकडे केवळ पाच आमदार शिल्लक राहिले होते. लुइझिन यांनी राजीनामा दिल्याने आता पक्षाकडे केवळ चार आमदार बाकी राहिले आहेत.